FeaturesMarathi

बाबासाहेबांच्या साक्षीने झालेले चैत्यभूमीवरील धर्मांतर

Whatsapp Image 2024 12 06 At 9.50.07 Pm

६ डिसेंबर आणि चैत्यभूमी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एक अशी घटना आहे की जितकी आकस्मिक, वेदनादायी आहे तितकीच ती आजच्या घडीला ऊर्जा देणारी आहे. बाबासाहेबांच्या राहत्या राजगृहापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शिवाजी पार्क आणि दादर चौपाटीवर बाबासाहेब आंबेडकर गेलेही असतील परंतु येथेच आपली तूफानमय जीवनयात्रा विसावेल असे त्यांच्याही कधी मनात आले नसेल.

आपल्या जीवनाच्या अखेरच्या काही महिन्यांत म्हणजेच १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी नागपूरात सामुदायिक धर्मांतर केले. न भूतो न भविष्यति असा हा ऐतिहासिक दिवस. कोणत्याही रक्तपाताशिवाय झालेल्या सर्वात मोठ्याधर्मांतरांपैकी एक. ‘अस्पृश्य’ हिंदू म्हणून जन्मलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी या ऐतिहासिक दिवशी नागपुरात त्यांच्या बहुतांश दलित समाजातील सुमारे पाच लाख अनुयायांसह समतेचा बौद्ध धर्म स्वीकारला.

यादरम्यान त्यांनी भारताचे संविधान निर्माण करून केवळ दलितांचं नाही तर सर्वजातीय महिला, ओबीसी, कामगार, अल्पसंख्यांक आणि इतर बहिष्क्रुत यांचे अधिकार शाबूत ठेवत भारताचे सार्वभौमत्व संविधानातील कलामांनी आणि परिशिष्टांनी जपले. भारताची लोकशाही अजूनही शाबूत आहे हे संविधानाच्या मजबूत असण्याचे लक्षण आहे.

मुक्ती भूमी ते दीक्षाभूमी

कोलंबिया आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सया विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर डॉ आंबेडकर भारतात परतले आणि महाड चवदार पाण्याची चळवळ आणि काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन या दोन सत्यग्रहांदरम्यान ते दलित समाजाचे निर्विवाद नेते म्हणून उदयास आले. या आधी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दलित चळवळीचा नेता जाहीर केले होते. दलितांना तळ्याचेपाणी पिण्यास आणि काळाराम मंदिरात प्रवेश करण्यास जातीय हिंदूंनी विरोध केला. आपण विद्याविभूषित होऊनहीआपल्यावरील जातिभेदाचे ग्रहण संपत नाही हे कळल्यावर त्यांचा धर्मांतराचा निश्चय दृढ़ झाला. आपण हिंदूम्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा बाबासाहेबांनी १९३५ साली येवला येथे केली. सुमारे २१ वर्षे त्यांनी मुक्तीचा मार्ग शोधला आणि नागपूरला बुद्ध धम्माची दीक्षा घेतली.

नागपूर ही दीक्षाभूमी म्हणून ओळखली जाते तर येवला ही मुक्तिभूमी म्हणून. परंतू चैत्यभूमी आणि धर्मांतर याबद्दलची माहिती बहुतांश जणांमध्ये अनभिज्ञ राहिली ती अशी कि ७ डिसेंबरला आणि ९ डिसेंबरला, म्हणजेच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर चैत्यभूमीवर खूप मोठे धर्मांतर घडले होते.

डॉ आंबेडकरांनी केवळ आजीवन भेदभाव सहन करावा लागला या एका कारणासाठी बुद्धाचा मार्ग स्वीकार केला नाही, त्यांना दलितांसाठी मुक्तीचा मार्ग हवा होता आणि त्यामुळेच त्यांचे धर्मांतर सकारात्मक ठरते. त्यांनी गौतम बुद्धांकडे केवळ वैयक्तिक पातळीवरच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी मुक्तीचा मार्ग म्हणून पाहिले.

डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर लहानपणापासून सिद्धार्थ गौतम बुद्धांचा प्रभाव होता. ते लहानपणापासूनच विद्रोही होते. आपल्या कठोर शिस्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कबीरपंथी वडील सुभेदार रामजी सकपाळ यांच्यासोबत ते रामायण-महाभारतावर वादविवादकरायचे, कित्येकदा ते आपल्या वडिलांना निरुत्तर करीत. इंग्रजी माध्यमातील चौथीची परीक्षा पास झाल्यानंतर बहुजन विचारवंत दादा केळुस्कर यांनी जेव्हा गौतम बुद्धांच्या जीवनावरील पुस्तक भेट दिले त्यावेळीपासून ते बुद्धाकडे वळले होते. केळुस्कर गुरुजी, रामजीसपकाळांचे जिवलग मित्र आणि महात्मा फुले यांच्या कार्यशैलीने प्रभावित झालेले बहुजन नेते होते. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचे शिक्षण हा त्यांचा जिवलग विषय. बाबासाहेबांची आणि बडोद्याच्या महाराज सयाजीराव गायकवाड यांची गाठभेट करून देणारेसुद्धाकेळूस्करच. या भेटीतूनच पुढे कोलंबिया विद्यापीठात शिकण्यासाठी बाबासाहेबांना महाराजांकडून शिष्यवृत्ती मिळाली. बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा धम्म या प्रस्तावनेत लिहितात, “केळूस्कर गुरुजींनी दिलेल्या पुस्तकाच्या मदतीने मी बुद्धाकडे वळालो. रिकाम्या मनाने मी त्या लहान वयात बुद्धाकडे गेलो नव्हतो. माझी एक पार्श्वभूमी होती आणि बौद्ध विद्या वाचताना मी नेहमी तुलना आणि विरोधाभास करू शकत होतो. बुद्ध आणि त्यांच्या धम्मात माझ्या आवडीचे हे मूळ आहे.”

मुंबईचे धर्मांतर

१४ ऑक्टोबरच्या कार्यक्रमासाठी आंबेडकरांनी नागपूर शहराची निवड केली, तरीही मुंबई ही धर्मांतराची जागा म्हणून चर्चेत होती. त्याचे एक कारण म्हणजे मुंबई बाबासाहेबांची कर्मभूमी होती. पण शेवटी आपल्या नागपूर निवडीबद्दल बाबासाहेब १५ ऑक्टोबरच्या नागपूरच्या भाषणात म्हणतात,“काही लोकांचे म्हणणे आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी फळी नागपूरात असल्याने त्यांना लाजवेल म्हणून हा सोहळा याच शहरात होत आहे. मात्र, ते खरे नाही. ज्यांनी बौद्ध इतिहासाचा अभ्यास केला आहे त्यांना हे कळेल की भारतात बौद्ध धर्माचा प्रसार करणारे नाग लोक होते. नाग लोक आर्यांचे कट्टर शत्रू होते. आर्य आणि गैर-आर्य यांच्यात अनेक घनघोर युद्धे झाली. आर्यांनी नागांना कुठे जाळले याची अनेक उदाहरणे पुराणात उपलब्ध आहेत. अगस्ती ऋषी फक्तएका नागाला वाचवू शकले. आम्ही त्याचे वंशज आहोत. अत्याचार सहन करणाऱ्या नागा लोकांना त्यांच्या उन्नतीसाठी कोणत्या तरी महापुरुषाची गरज होती आणि त्यांना तो महापुरुष भगवान गौतम बुद्धामध्ये सापडला. नागांनी भगवान बुद्धांच्या शिकवणीचा भारतभर प्रचार केला. असे आपण नाग आहोत. नागा लोकांची प्रमुख वस्ती नागपुरात व आसपास होती. म्हणून या शहराला ‘नाग-पूर’ (म्हणजे नागांचे शहर) म्हणतात.”

आंबेडकरांनी जातिव्यवस्था नाकारली आणि धर्मांतर झाल्यानंतर १५ ऑक्टोबरच्या नागपूर मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. मनुस्मृतीत चातुर्वर्ण्य आहे. चातुर्वर्ण्यव्यवस्था मानवजातीच्या प्रगतीसाठी अत्यंत हानिकारक आहे. बौद्धधर्म हा अस्पृश्यांसाठी पुढारलेला धर्म आहे अशी त्यांची खात्री होती. त्यांनी धर्मांतरावर टीका करणाऱ्या लोकांना उत्तर दिले,“आम्ही आमच्या मार्गावर जाऊ, तुम्ही तुमचे अनुसरण करा. आम्ही एक नवीन मार्ग शोधला आहे. हा आशेचा दिवस आहे. हा उन्नतीचा आणि प्रगतीचा मार्ग आहे. हा नवीन मार्ग नाही. हा मार्ग कोठूनही उसना घेतलेला नाही. हा मार्ग येथून आहे, तो पूर्णपणे भारतीय आहे. बौद्ध धर्म भारतात २,००० वर्षे टिकला. खरे सांगायचे तर, आपण यापूर्वी बौद्ध धर्म का स्वीकारला नाही याबद्दल आपल्याला खंत वाटते. भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत.”

Whatsapp Image 2024 12 06 At 9.50.11 Pm
Dr Ambedkars dead body being brought to Rajgruha from Mumbai airport

१९५७च्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे बाबासाहेबांचे काही राजकीय सहकारी आणि प्रमुख राजकीय नेते नागपुरातील दीक्षेमध्ये पूर्ण मनाने सहभागी झाले नव्हते. त्यांच्या मते एकत्रित मतदारसंघ रचनेमुळे धर्मांतर त्यांच्या निवडणुका जिंकण्याच्या शक्यतांवर परिणाम करू शकले असते. त्यामुळे निवडणुकांनंतर धर्मांतर व्हावे असे त्यांना वाटे. पण बाबासाहेबांचा निश्चय द्रूढ होता. दरम्यान, डॉ आंबेडकरांच्या मुंबईतील उत्साही सहकाऱ्यांना किंचित निराश वाटली की त्यांनी पहिल्या धर्मांतरासाठी त्यांचे शहर निवडले नाही. दादासाहेब गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रात डॉ आंबेडकरांनी त्यांच्या पहिल्या दीक्षा सोहळ्यासाठी नागपूरच्या निवडीबद्दल मुंबईतील लोकांची निराशा मान्य केली. त्यांनी गायकवाड यांना आश्वासन दिले की नागपुरातील सुरुवातीच्या समारंभानंतर मुंबई आणि संपूर्ण भारतात असेच कार्यक्रम होतील.

डॉ  आंबेडकरांनी त्यावर्षी मुंबईतील दीक्षा कार्यक्रमासाठी १६ डिसेंबर १९५६ ही तारीख निश्चित केली होती. सोलापूरसारख्या इतर ठिकाणीही अशाच कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. १५ डिसेंबरच्या दिवशी शाम हॉटेलमध्ये सोलापुरातील आपले सहकारी डी व्ही फडतरे, रणशृंगारे, आबुटे यांना सोलापूरचे नियोजन भक्कम करा, पाच लाखाहून अधिक मोठा कार्यक्रम करा, असा संदेश देखील बाबासाहेबांनी दिला होता . तथापि, ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीत त्यांचे अनपेक्षित निधन झाले. पुढचे कार्यक्रम होऊ शकले नाहीत. आणि त्यांच्या करोडो अनुयायांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला. 

राज्यसभा सदस्य असण्याने डॉ आंबेडकर दिल्लीवासी होते. त्यांची प्राणज्योतसुद्धा दिल्लीतल्या अलीपूर रोडवरील निवासात मावळली होती. परंतू त्यांचे अंतिम संस्कार दिल्लीत होऊ दिले गेले नाही नाही किंवा जागा उपलब्ध करू दिली नाही. तसे झाले असते तर महात्मा गांधींच्या राजघाटाप्रमाणे बाबासाहेबांची दिल्लीतील चैत्यभूमी देशाचे प्रमुख ठिकाण असते. कदाचित महाराष्ट्रात अंत्यसंकर करून बाबासाहेबांना एका राज्यापुरतं मर्यादित करण्याचा प्रयत्न झाला. परंतु सूर्याप्रमाणे असलेले बाबासाहेबांचे  तेज  आज देशातच नव्हे तरविदेशातही झळाळत आहे. 

महापरिनिर्वाणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ डिसेंबररोजी, आंबेडकरांचे पार्थिव विमानाने मुंबईत आणण्यात आले, जिथे हजारो शोकाकुल लोक विमानतळावर वाट पाहत होते. ६५ वर्षांतच त्यांची प्रखर प्राणज्योत मावळली होती. आणखी कितीतरी कामांचे नियोजन, अनेक पुस्तकांचे लिखाण, रिपब्लिकन पक्षाची धोरणे आणि स्थापना, देशभर धर्मांतराचे सोहळे अशी कितीतरी कामे नियतीने अर्धीच ठेवली होती. विमानतळ ते राजगृह आणि राजगृह ते चैत्यभूमी ही अंत्ययात्रा न भूतो न भविष्यती अशी झाली होती. गोगलगायीच्या वेगाने लाखो लोक बाबासाहेबांसोबत चालत होते. हि यात्रा कधीच संपू नये असे कदाचित त्यांना वाटत असावे.

ऐन वेळी शिवाजी पार्क मैदानावर डॉ आंबेडकरांच्या अंत्यसंस्कारासाठी काँग्रेस सरकार आणि बीएमसी आयुक्तांनी परवानगी नाकारली (विशेष म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळातच याच शिवाजी पार्कवर २०१२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कारकरण्यात आले). शेवटी अंत्यसंस्कार दादर समुद्रकिनाऱ्याजवळ डॉ आंबेडकरांचे सहकारी सी.के. बढे यांच्या खाजगी मालकीच्या जमिनीवर झाले.

त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण होईपर्यंत, मुंबईच्या दादर समुद्रकिनाऱ्यावर अंदाजे 10 लाख लोक जमले होते आणि त्यांच्या लाडक्या बाबासाहेबांच्या पार्थिवाचा विचार करत होते, जे लवकरच अनंतात विलीन होणार होते. आयुष्यभर आपल्या खंबीर पंखाखाली दिनदलितांना रक्षणाची उब देणारे त्यांचे बाबासाहेब त्यांना सोडून जाणार होते. बाबासाहेबांचे प्रमुख सहकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साहित्यिक ज. वि. पवार लिहितात, “अंतिम संस्कारापूर्वी अचानक दादासाहेब गायकवाड उभे राहिले आणि जनतेला उद्देशून म्हणाले , बाबासाहेब १६ डिसेंबर रोजी इथे मुंबईतधम्मदीक्षा देणार होते, स्वतःच्या पायावर चालत मुंबईत येणार होते. तुमचे हात धरून तुम्हाला बुद्धाकडे नेणार होते. पण घडले उलटेच. आज बाबासाहेब इथे आहेत. पण त्यांचे पार्थिव चितेवर आहे, त्यांच्या सल्ल्यानुसार बौद्ध धर्म स्वीकारूया. भदन्त आनंद कौसल्यायन तुम्हाला दीक्षा देतील. जे यास सहमत आहेत ते हात वर करू शकतात. जमावाने या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि भंते यांनी सुमारे १० लाख लोकांना धम्मदीक्षा दिली. भन्ते यांनी पाली भाषेत दीक्षा दिल्यानंतर आंबेडकरांचे सहकारी शंकरानंद शास्त्री यांनी सर्वांना बुद्धाच्या उपदेशांचे पालन करण्यास सांगितले.”

अशा रीतीने नागपूरहूनसुद्धा मोठे धर्मांतर मुंबईत ७ डिसेंबरला झाले होते. दोन्ही ठिकाणी बाबासाहेबांच्या साक्षीने धर्मांतर झाले. नागपुरात माईंसोबत असणारे बाबासाबेब मात्र चंदनाच्या चितेवर शांतपणे एकटे पडून होते. नागपूरच्या धर्मांतराच्या वेळी खुल्या मानाने सहभागी न झालेले त्यांचे काही सहकारी आता दिक्षेसाठी मनातून सहभागी झाले होते.

महापरिनिर्वाणाच्या तीन दिवसांनंतर म्हणजे ९ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या अस्थी भैयासाहेब आंबेडकर आणि मुकुंदराव आंबेडकर गोळा केला करत असताना सुमारे तीन लाख लोक जमले होते. ६ डिसेंबरला मुंबईला पोहोचू न शकलेले अनेकजण त्यादिवशी उपस्थित होते. भदंत आनंद कौसल्यायन यांनी पुन्हा एकदा सर्वांना दीक्षा दिली. अशा रीतीने दोन दिवसांत मुंबईत सुमारे 13 लाख लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तत्कालीन राज्य सरकारच्या गुप्तचर अहवालातसुद्धा 7 डिसेंबरच्या सामुहिक धर्मांतराची पुष्टी केलेली आढळते.

धर्मांतर करूनही ‘शेड्युल कास्ट फेडरेशन'(शेकाफे) ला १९५७ च्या लोकसभा आणि विधानसभेत दैदिप्यमान यश मिळाले. १९५२ च्या मानाने यश कित्येक पट वाढले होते. देशभरात मुंबई आणि म्हैसूर प्रांतात मिळून ६ खासदार तसेच विविध प्रांतीय निवडणुकीत अनेक आमदार निवडून आले. देशात काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी, प्रजा समाजवादी पार्टीनंतर चौथा मोठा पक्ष म्हणून ‘शेकाफे’ उदयास आला. याच दरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळ जोमात असल्याने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि ‘शेकाफे’च्या युतीला भरघोस यश मिळाले. इतकेच नव्हे तर बीएमसीमध्ये संख्याबळाच्या आधारावर १९५९ मध्ये वर्षात शेकाफे ला पी. टी. बोराळे यांच्यारूपी महापौरपद सुद्धा मिळाले.

नंतरच्या काळात रिपाइंची शकले झाली परंतु धर्मांतर करूनही आंबेडकरी शक्ती अबाधित राहिली. बहुतेक हेच बाबासाहेबांना अभिप्रेत असावे आणि म्हणूनच राजकीय यशापशयाचा विचार ना करता क्षणाचा विलंब ना करता बुद्धाचा मार्ग निवडणे त्यांनी पक्के केले होते. बौद्धांना अनुसूचित जातीमध्ये सामील करून घेण्याबाबत बाबासाहेब प्रचंड आत्मविश्वासू होते. विश्वासू सहकाऱ्यांचे ऐकून बाबासाहेबांनी १९५७ च्या निवडणुकी नंतर धर्मांतराचा कार्यक्रम ठेवला असता तर काय झाले असते याचा विचार करवत नाही.

६ डिसेंबरच्या निमित्ताने चैत्यभूमीवरील धर्मांतराची आठवण झाली. आजही करोडो अनुयायी देशाच्या कानाकोपऱ्यातून आजही दरवर्षी प्रेरणा घेण्यास येतात. तथागत गौतम बुद्धांनी आपले शिष्य आणि परमस्नेही आनंद यांना आपल्या शेवटच्या क्षणी सूर्यासारखे स्वयंप्रकाशित व्हा पृथ्वीसारखे परप्रकाशी नाही,सत्याला धरून राहा, सत्याचाच आश्रय करा, दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका असे सांगितले होते. बाबासाहेबांनी बुद्धाचाच निरोप देत १९३६ साली दलितांना सत्याचा आधार घेण्यास सांगितले होते.

बाबासाहेब सूर्यासारखे जगले आणि याच सूर्याची ऊर्जा घेण्यासाठी आंबेडकरी समाज चैत्यभूमीकडे धावतो. अथांग सागर आणि सूर्याचे मनोमिलन म्हणजेच चैत्यभूमी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button