FeaturesMarathi

आज तुम्ही बिनाविधी रजिस्टर लग्न करू शकता ह्यासाठी महात्मा फुले आणि खेडोपाडीच्या सत्यशोधकांनी केलेला संघर्ष

Balaji Patil
बाळाजी पाटील

देशात इंग्रजांचे प्रशासन असताना गावांमध्ये श्रीमंत सावकार आणि त्यांना मदत करणारे ग्रामजोशी व ब्राह्मणकाका यांची एक साखळी तयार झाली होती. लग्नकार्य, पूजाअर्चा, जन्मापासून ते मरणापर्यंतचे सर्व विधी, शुभ-अशुभ अशी सगळी धार्मिक कामे करण्यासाठी गावात ब्राह्मणकाका असत. जुन्नर भागात अजूनही यासाठी ग्रामजोशी ही संकल्पना आढळते. उत्तरेतील काही राज्यांमध्ये देखील ही संकल्पना अजून रुजून आहे.

खरंतर शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या गरजा भागविण्यासाठी सुतार, लोहार, कुंभार, सोनार, चांभार, महार, मांग किंवा मातंग, न्हावी, परीट, गुरव, ग्रामजोशी व कोळी अशा बारा बलुतेदारांचा एक वर्ग गावाच्या अर्थव्यवस्थेत आपोआपच तयार होत गेला होता. मात्र या व्यवस्थेत जेव्हा वर्णव्यवस्था घातली गेली तेव्हा मात्र त्यांच्यात भेदभाव आणि जातींना पारावार उरला नाही. महाराष्ट्रात पैसेवाले आणि धर्मवाले यांची युती ओळखणारे पहिले माणूस होते महात्मा जोतिराव फुले.

पुण्याच्या जुन्नर भागामध्ये १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात या सावकारशाहीविरुद्ध मोठे आंदोलन उभे राहिले होते. पण पुण्यातील जवळपास सर्वच वर्तमानपत्रे व जनता सावकारांच्या बाजूने उभी राहिली होती. शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात होता. तेथील भाऊ पाटील या कार्यकर्त्याने जेव्हा महात्मा फुले यांची मदत मागितली तेव्हा ते पुण्याहून निघाले व त्यांनी थेट जुन्नरमध्ये जाऊन लोकांची सभा भरवली आणि शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दिला. “आम्ही शूद्रातिशूद्र लोक माळी, कुणबी, धनगर, महार, मांग, चांभार, मराठे, भिल्ल आणि कोळी आपल्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत. अतिशूद्र बांधवांना भावासारखे वागवा यानेच समाजाचे कल्याण होणार आहे” अशी स्पष्ट आणि उघड सूचना महात्मा फुलेंनी ओतूरच्या आपल्या भाषणात सगळ्या गावासमोर दिली. 

पंधरा हजार लोकांचा प्रचंड जनसमुदाय त्यांच्यासमोर होता व त्यांनी फुलेंच्या म्हणण्यानुसार आपल्या सर्व धार्मिक जीवनातून ब्राह्मणी विचारांना बाहेर काढण्याचे ठरवले. पण लग्न म्हणजे ब्राह्मण-ग्रामजोशी-दक्षिणा हे समीकरण ठरलेले होते. आजची नाही तर ही शतकानुशतके चाललेली प्रथा होती. ती इतकी रुजलेली होती की काळाच्या ओघात अशी दक्षिणा वसूल करणे हा वतनदार जोश्यांचा वंशपरंपरागत हक्क बनला होता. 

ही ईश्वर आणि माणसामधील मध्यस्थाची कल्पना उधळून लावण्यासाठी सत्यशोधक समाजाने आपल्या समुदायातील विवाह हे ब्राह्मण व जोशी यांच्या कोणत्याही अनुमतीशिवाय स्वतःचे स्वतः करायला सुरुवात केली. मात्र ब्राह्मणेतर लोकांना हा लग्न करून घेण्याचा अधिकारच नाही व या सर्व गोष्टी आणि लग्न हक्कदार भटांकडून करवून घेतली नाहीत तरी ग्रामजोशाला दक्षिणा हक्काने मिळालीच पाहिजे, असे सर्व कर्मठ लोकांचे म्हणणे होते. मात्र त्यांच्या या म्हणण्याला न जुमानता सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मुला-मुलींची लग्ने लावायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात जेव्हा त्यांना ब्राह्मणांच्या कोणत्याही मदतीशिवाय लग्न लावता येत नव्हती तेव्हा फक्त “हर हर महादेव” असे मंडपात म्हणून लग्न लावण्यात येत असे. ओतूरमधील सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्ते बाळाजी पाटील यांनी आपल्या दोन मुलींची लग्ने महात्मा फुलेंच्या उपस्थितीत अशाच प्रकारे उरकून दिली व फुले पुण्याला परत आले. (बरेचदा याच बाळाजी पाटील यांचा फोटो महात्मा फुले यांचा फोटो म्हणून पसरवून दिला जातो.) 

पण फुले पुण्याला परतताच येथील ब्राह्मण लोकांनी स्थानिक पाटील व इतर सत्यशोधक समाजाच्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली व पौरोहित्य करण्याबद्दल आपले पैसे मागितले. “ज्या अर्थी विवाह झाला आहे, त्या अर्थी आम्ही तिथे असो अथवा नसो, तरीही ब्राम्हणांना दक्षिणा देणे हे  तुमचे कर्तव्य आहे.” अशी भूमिका घेत पुण्याच्या ब्राह्मण वर्गाने दक्षिणा देण्याची मागणी केली. 

वास्तविक पाहता जे काम आपण केले नाही त्यासाठी मोबदला मागणे म्हणजे न शिकवलेल्या विद्येसाठी द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागणे असेच आहे, असं स्थानिक लोकांचं मत पडलं. आपल्याला स्वतःच्या मर्जीप्रमाणे विवाह सुद्धा करता येऊ नये व न केलेल्या कामासाठी इतर कुणाला पैसे द्यावेत ही कल्पना तत्कालीन सुधारणावादी विचारांच्या लोकांना रुजली नाही व म्हणूनच त्यांनी ही दक्षिणा देण्यास नकार दिला. याविरुद्ध ब्राह्मण मंडळींनी थेट न्यायालयात अपील केले. या न्यायालयात महादेव श्रीधर जोशी हे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते व त्यांचा ब्राह्मण समाजाच्या विषयीचा दृष्टीकोन हा सनातनी ब्राह्मणासारखा होता, त्यामुळे त्यांनी या खटल्यात तडकाफडकी निकाल सत्यशोधक समाजाच्या विरोधात अपील करणाऱ्या ग्रामजोशी ब्राह्मणांच्या पक्षामध्ये लावून दिला व सत्यशोधक समाजाच्या डुमरे पाटील या नुकसानीसाठी दंड भरावयाला सांगितले. स्वतःच्या पोटच्या मुलीचे लग्न लावले म्हणून दंड भरायला लागणे ही जगाच्या पाठीवर घडलेली एकमेव घटना असेल. न्यायालयाने याला दुजोरा दिला. इंग्रजी शासन असूनही त्यात ब्राह्मण्यवाद किती खोलवर रुजला होता याचे हे बोलके उदाहरण!

पण न्यायालयाने निकाल विरोधात देऊन जोतिबा कुठे थांबणार होते! ज्या लोकांनी आपल्या अंगावर हल्ला केल्यानंतरही थोडेही विचलित न होता त्याचा सामना केला, सगळ्या पुण्याशी एकहाती लढत देत समाजपरिवर्तन करण्यासाठी काम केले त्या महात्मा फुले यांच्याकडून माघार घेण्याची अपेक्षा करणे व्यर्थ होते. त्यांनी ही लढाई जनतेच्या कोर्टात आणि रस्त्यांवर लढायचं ठरवलं. त्यांनी आपल्या एका सत्कार सोहळ्याचा वापर याकामी करून घ्यायचं ठरवलं.

1884 ला त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी व सत्यशोधक समाज जिथपर्यंत पसरला आहे तेथील सर्वांनी एकत्र येऊन महात्मा फुले यांचा त्यांच्या जीवनातील कार्याबद्दल फार मोठा सत्कार सोहळा आयोजित केला. सत्कारसोहळा झाला तेव्हा सत्यशोधक कार्यकर्ते ओतुरचा खटला जिंकले नव्हते, मात्र खटल्यामुळे महात्मा फुलेंच्या सहकाऱ्यांचं मनोबल वाढलं होतं. जिल्हा कोर्टाचा निर्णय आपल्या विरोधात लागला याविरुद्ध त्यांनी थेट जनतेकडे जाण्याचे ठरवले व लोकांना या खटल्यासंबंधी माहिती व्हावी म्हणून त्यांनी खालील प्रकारची खबर प्रसिद्ध केली ज्याची पत्रके सर्वत्र वाटण्यात आली.

“ग्रामजोश्यासंबंधी जाहीर खबर (१८८४)”

जोतीराव गोविंदराव फुले

(ग्रामजोश्यांच्या हक्काबद्दलच्या मोकदमा नंबर ८३१ सन १८८४ यांतील हंशील.)

जाहीर खबर

सर्व हिंदु धर्मानुयायी त्यांतून मुख्यत्वेंकरून मराठे, माळी, कुणबी, कोळी, धनगर वगैरे जातीचे लोकांस ह्या पत्राद्वारे जाहीर करण्यांत येते की, ब्राह्मण लोक आमचे लोकांकडून लग्नकार्यास किंवा देवदेवतांच्या पूजाअर्च्या करण्यासमयीं आणि इतर शुभाशुभ कार्याचे वेळीं मनास वाटेल त्याप्रमाणे यजमानाकडून अडवून पैसे घेतात. ह्या सर्व कारणांकरिता व प्रत्येक मनुष्यास आपापले धर्मसंबंधी कार्य करण्यास हिंदु शास्त्राची पूर्ण सत्ता असल्यामुळें आज कित्येक दिवसांपासून वर दर्शविले जातींचे लोक ह्या मुंबई इलाख्याचे कित्येक भागावर ब्राह्मणांचे (भटांचे) साह्याशिवाय वर दर्शविलेलीं धर्मसंबंधी कार्यें करीत आहेत; परंतु हें करणें भट लोकांस न आवडून व त्यांचे रक्ताचें पाणी झाल्याशिवाय फुकट मिळत असलेलीं उत्पन्नें बुडूं पहात आहेत, हें जाणून जुन्नर प्रांतातील भटांनी ओतूर येथील कांही जोशांस पुढें करून रा॰ बाळाजी उर्फ काशीबा कुशाजी पाटील डुमरे, ओतुरकर यांनीं आपल्या दोन मुलींची लग्नें स्वतः लाविलीं म्हणून भटांची ६॥ रुपये (साडेसहा असं लिहायचे तेव्हा, दिडकी पाठ असणाऱ्या लोकांना माहीत असेल) नुकसान झाली, यास्तव ती नुकसान सदरचे बाळाजी यांजकडून भरून घेण्याकरितां वामन जगन्नाथ, शंकर बापुजी, बळवंत सखाराम, रामचंद्र सदाशिव जोशी, उदास या सर्वांनी जुन्नर कोर्टांत फिर्याद केली. सांप्रतचे काळास अनुसरून पहातां भटांचा कोणत्याही प्रकारचा हक्क इतर लोकांवर पोंचत नाहीं, हे न्यायदृष्टीने उघड असून न्यायाधीश महादेव श्रीधर, सबार्डिनेट जज्ज, जात ब्राह्मण यांनी आपले ब्राह्मण फिर्यादीचे स्वरूपाकडे पाहून ता॰ २९ मार्च सन १८८६ इसवी. रोजीं असा ठराव केला की, प्रत्येक लग्नाबद्दल प्रतिवादी बाळाजी पाटील डुमरे यांनी ४ आणे म्हणजे दोनी लग्नांबद्दल ८ आणे द्यावेत असा ठराव केला. ह्या ठरावाबद्दल वरिष्ठ कोर्टांत प्रतिवादी यांजकडून अपील होणें आहे व अपीलाचा निकाल लागेपर्यंत आमचे लोकांनी म्हणजे ज्यांचे येथें लग्नकार्यें होतील व जेथें भटजी किंवा ग्रामजोशी लग्न लाविण्याबद्दल हक्काने पैसा मागतील, तेथें प्रत्येक लग्नाबद्दल मशारनिल्हे रा॰ सा॰ सबजज्ज यांच्या ठरावान्वये तूर्त चारच आणे लग्न साडे वगैरे विधि करून घेतल्यानंतर द्यावे लागतील व हे सबजज्ज साहेबांच्या फैसल्यावरून सर्वांस कळविण्यात येत आहे.

या खटल्यातील फिर्यादीच्या क्रमांक (फिर्यादाचा क्रमांक ८३१) आणि सन १८८४ चा जुन्नर कोर्टाचा शिक्का JUDGE JUNAR SUBORDINATE COURT हा देखील फुले यांनी या पत्रामध्ये समाविष्ट केला आहे.

सर्वात शेवटी या खटल्यातील आरोपींची नावे त्यांनी लिहिली आहेत: (पा. याचा अर्थ पाटील असा वाचणे)

जोतीराव गोविंदराव फुले
नारायण मेघाजी लोखंडे
भाऊ कोंडाजी पा. डुंबरे
रामचंद्र तुकाराम हेजीब
लक्ष्मण गणुजी शेटे
विश्राम कुशाजी पा. पवार
रावजी मल्हारजी बोकड
संतु रामजी लाड
चिमणाजी मथाजी पा. डुंबरे
गणु बापुजी पा. डुंबरे

अशाप्रकारे फुले यांनी यावेळी समाज बदलण्यासाठी वेगळी युक्ती वापरली व लोकांमध्ये पहिल्यांदा आपल्या बाजूने जनमत निर्माण केले. यानंतर त्यांनी  बाळाजी पाटलांना पुन्हा पुणे येथील पहिल्या वर्गातील दुय्यम न्यायाधीशांकडे आवेदन करायला सांगितले. साहजिकच, हे न्यायाधीश महादेव श्रीधर यांच्याहुन वरिष्ठ न्यायाधीश होते. त्यांनी या खटल्याचे पुनरावलोकन करुन खटल्याचा निकाल पाटील यांच्या बाजूने दिला.

इथे सत्यशोधक समाजाचा विजय झाला होता मात्र सनातनी लोकांना ही बाब रुचण्यासारखी नव्हती. म्हणून त्यांनी याचा बदला घेण्यासाठी जुन्नर व पुणे या दोन शहरांमध्ये ब्राह्मणांच्या सभा भरविल्या व त्यानंतर मुंबई येथील उच्च न्यायालयामध्ये हा खटला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या जुन्या दस्तऐवजांमध्ये Sir Charles Sargent and Mr. Justice Candy in Waman Jagannath Joshi v. Balaji Kusaji Patil (1888) I.L.R, 14 Bom. 167,169 नावाचा खटला अजूनही सापडतो. ह्या खटल्याचा वापर पुढे वेळोवेळी केला गेला आहे. ह्यात वामन जोश्यानी बाळाजी पाटलांवर आरोप केले की त्यांनी आपल्या पौरोहित्य करण्याची फी बुडवली आहे. ह्यातून मार्ग काढण्यासाठी न्यायालयात हा विवाह शास्त्रोक्त नाही हे सिद्ध करण्यात आले. हा विवाहच शास्त्रोक्त नसल्याने त्यासाठी दक्षिणा द्यायची गरजच काय असा सडेतोड प्रतिवाद फुले आणि पाटील यांच्या पक्षाने केला. त्यांच्याशी सहानुभूती असणाऱ्या साक्षकर्त्या लोकांनी न्यायालयात जबाब दिले की,

The marriages were performed without any prescribed ceremonies, and no priest as such was employed. There was no Ganesh poojan. There was nothing beyond the placing of garlands on the necks of the bride and bridegroom. There was no distribution of fees; therefore the village Joshis cannot claim any fees. There is a separate ritual for the Sudras of the defendant’s caste. That ritual was not performed.

हा विवाह ‘घरचे लग्न’ ह्या पद्धतीने झाला असल्याने आणि त्यामध्ये तुम्ही दक्षिणा दिली नसल्याने जोशी किंवा ब्राह्मण समुदायाचा दक्षिणेवरील अधिकार सिद्धच होत नाही, अशी कबुली कोर्टासमोर दिली गेली. बाळाजी पाटील यांनी आपल्या कबुलीमध्ये बोलताना सांगितले की “आमचे पूर्वज वर्षानुवर्षे या प्रकारचा विवाह करत असल्याचे गावातील जुन्या लोकांचे म्हणणे होते. माझ्या जातीतील लोकांनी सांगितले त्याप्रमाणे मी हा विवाह केला आहे त्यामुळे मला त्याच्या तांत्रिक/वैधानिक बाबींविषयी काहीही शंका नाही. घरचे पुरोहित वापरून आम्ही हा विधी केला आहे.” 

न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य केले व न्यायालयाच्या दोन्ही जज सर चार्ज सार्जंट आणि जस्टीस कॅंडी यांनी खालच्या न्यायालयाचा निकाल बदलून या खटल्याचा निकाल पाटील व फुले यांच्या पक्षामध्ये दिला व बहुजनांचा स्वतःचे पौरोहित्य स्वतः करण्याचा अधिकार मान्य केला. इथून पुढे लग्न करण्यासाठी किंवा कोणताही धार्मिक विधी करण्यासाठी हिंदू धर्मातील लोक ब्राह्मण पुरोहित बोलवण्याच्या बंधनातून कायमचे मोकळे झाले. देशातील जवळपास सर्व विवाह आणि त्यासंबंधीचे निवाडे करताना या खटल्याचा कायदा म्हणून स्वीकार केला गेला व यानंतर जे खटले देशांमध्ये उभे राहिले या सर्व घटनांमध्ये पाटील विरुद्ध जोशी हा खटला नोंदवत नेहमीच बहुजनांच्या बाजूने निकाल दिला गेला. 

आणि त्यानंतर महात्मा फुले यांनी ब्राह्मण नसताना सत्यशोधक पद्धतीने विवाह कसे करावे त्याच्या संरचना आखून दिल्या व मंगलाष्टके तयार केली.

असे शेकडो खटले ब्राह्मण लोकांनी बहुजनांच्या विरुद्ध भरले. सन १९०० ते १९०४ यादरम्यान झालेल्या अशा सर्व घटनांचा तपशील शास्त्री नारो बाबाजी महादु पाटील पानसरे, राहणार ओतुर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे यांनी “ब्राह्मणांचा हक्क काही नाही कशाबद्दल हायकोर्टाचे झालेले ठराव” या एका पुस्तिकेमध्ये थेट प्रकाशित करून टाकला. या पुस्तकालाही पुण्यात कोणी प्रकाशक लाभला नाही म्हणून हे पुस्तक गायकवाडांच्या बडोदे संस्थांनाकडून प्रकाशित करण्यात आले.

आजच्या काळात जेव्हा न्यायालयात रजिस्टर लग्न लावले जाते तेव्हा त्यामागे पुण्याच्या ग्रामीण भागाच्या बारा मावळातील शेतकऱ्यांनी महात्मा फुल्यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या लढ्याचे योगदान आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर आजही हे विवाह भटशाहीच्या लवाजम्यासह करावे लागले असते.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button